धमकीनंतर गुरमेहर सोडणार दिल्ली

नवी दिल्ली : शहीद जवानाची मुलगी गुरमेहर कौर दिल्ली सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जाणार आहे. बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकीनंतर तिने हा निर्णय घेतला आहे.

दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करत चौकशी सुरु केली आहे. गुरमेहरला सुरक्षा पुरवली जाईल आणि धमकी देणाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असं दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावरून बलात्काराच्या धमक्या येत असल्याची तक्रार गुरमेहर कौर हीने दिल्ली महिला आयोगाकडे केली होती. गुरमैहर कारगिल युद्धातील शहीद जवान मनदीप सिंह यांची मुलगी आहे.

दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील हिंसाचारानंतर गुरमेहरने त्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र यानंतर आपल्याला अभाविपकडून बलात्काराची धमकी मिळाली, पण मी अभाविपला घाबरत नाही, असा फलक हाती घेतलेला फोटो गुरमेहरने फेसबुकवर टाकला होता.

गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यामुळे आपल्या वडिलांना पाकिस्तानने नाही, तर युद्धाने मारलं, असंही वक्तव्य गुरमेहरने केलं होतं.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही गुरमेहरला पाठिंबा दिला आहे. भीती आणि छळाच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता, राग आणि अज्ञानतोविरोधात प्रत्येक ठिकाणी एक गुरमेहर उभी राहील, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.