तुमच्यात हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच, सेनेच्या वाघाने फोडली डरकाळी

chandrkant patil and devendra fadanvis

जळगाव : राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यपालांच्या भेटीगाठीवरून राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपकडून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. आता यावर शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.

राज्य सरकार पडणार असल्याच्या वावड्या काल-परवापासून उठवल्या जात आहेत. एकीकडे कोरोनासारखं संकट असताना दुसरीकडे अशा चर्चा केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या वावड्या म्हणजे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोरोना संकटाच्या काळात एकाग्रतेनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विचलित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

महाराष्ट्राच्या युवकांबाबतचे फडणवीसांचे ‘ते’ वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, प्रणिती शिंदेंनी डागली तोफ

कोरोनाचं संकट संपल्यानंतर मैदानात येऊया. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सरकार पाडाच, असं थेट आव्हान पाटील यांनी विरोधकांना दिलं. भाजपानं सरकार पाडून दाखवावं. पण त्याआधी सरकार कोरोना संकटात हरतऱ्हेचे प्रयत्न करत असताना स्वत: किती पुढाकार घेतला, त्याचा विचार विरोधकांनी करावा, असं पाटील म्हणाले. विरोधकांकडून कोरोनाच्या काळातही राजकारण सुरू आहे. मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांच्या दाव्यांची एकट्या फडणविसांनी केली ‘चिरफाड’