गुजरातमध्ये भाजपचं ठरणार ‘बाहुबली’

टीम महाराष्ट्र देशा : गुजरात जिंकण्यासाठी मोदींनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी राहुल गांधी झंझावाती प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणातून भाजपला गुजरातमध्ये तब्बल दोन तृतीयांश जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या भाजपला सरकारविरोधी लाटेचा फटका बसणार नाही, असे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. विशेष म्हणजे अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल हे तिन्ही तरुण नेते भाजपविरोधात असूनही सत्ताधारी पक्षाला दोन तृतीयांश जागा मिळण्याची शक्यता आहे. तीन तरुण नेते आणि राहुल गांधी संपूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरले असतानाही भाजप मागील कामगिरीची पुनरावृत्ती करेल, असे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.

इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान सर्वेक्षण केले होते. यामधील आकडेवारीवरुन भाजपाला ११५ ते १२५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला ५७ ते ६५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला ११६ आणि काँग्रेसला ६० जागा जिंकण्यात यश आले होते. या सर्वेक्षणात १८,२४३ लोकांची मते विचारात घेण्यात आली असल्याचे इंडिया टुडे समूह आणि अॅक्सिस माय इंडियाने म्हटले आहे.

काँग्रेसला ५७ ते ६५ जागा मिळू शकतात.सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी गुजराती जनतेने विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच पसंती दिली आहे. ३४ टक्के लोकांना विजय रुपानी यांनीच पुन्हा राज्याचे नेतृत्त्व करावे, असे वाटते. तर शक्ती सिंह गोहिल (काँग्रेस), भरत सिंह सोळंकी (काँग्रेस), अमित शहा यांना अनुक्रमे १९ टक्के, ११ टक्के आणि १० टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे.Loading…
Loading...