कचरा प्रश्न औरंगाबाद: महिनाभरापासून शहराकडे न फिरकलेल्या पालकमंत्र्यांची अखेर शहरात हजेरी

sawant-deepak

औरंगाबाद: कचरा प्रश्नामुळे मिट्मिटामध्ये दंगल झाली, दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा झाल्या आणि पालकमंत्री दीपक सावंत यांना नारेगाव येथील आंदोलकांची महिनाभरापूर्वी घेतलेल्या भेटीनंतर आज औरंगाबादमध्ये येण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यांनी शहरातील काही भागाची पाहणी केली व जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.

शहरातील कचरा कोंडी महिनाभरानंतरही कायम असून रस्त्यावर, मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग पडून असून, त्यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात १५ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण झाला होता. त्यातील १४ हजार ६४६ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. व सध्या केवळ पाच टक्के म्हणजे, ७०२ टन कचरा रस्त्यावर पडून आहे, असे दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शहरात ७७ ठिकाणी कम्पोस्टिंग पिट्स बसवण्यात आल्या आहेत व लोकांचा सकारात्मक प्रतिसाद असून लवकरच कचरा प्रश्न सुटेल असेही त्यांनी स्पष्ट केले.