fbpx

सोलापूर जिल्हा परिषदेत राजकीय खलबत, पालकमंत्र्यांनी घेतली प्रमुख नेत्यांची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढली आहे. शिंदे यांनी निवडणुकीत ऐनवेळी साथ सोडल्याने भाजप नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे संजयमामांची कोंडी करण्यासाठी लोकसभा निकालापूर्वीच जिल्हा परिषदेत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली जात आहे.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत समविचारी नेत्यांची बैठक घेण्यात आली आहे, या बैठकीला माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार नारायण पाटील,आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार शहाजीबापु पाटील, माजी आमदार राजाभाऊ राऊत, उत्तम जानकर, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, अर्थ समिती सभापती विजयराज डोंगरे, पक्षनेता आनंद तानवडे, बबनराव आवताडे तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत संजय शिंदे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.लोकसभा निवडणुकीत झालेल्या उलथापालथीमुळे सोलापूर जिह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे, मोहिते पाटलांचा भाजप तर संजयमामा शिंदेंच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाने राजकीय गणित बदलले आहे.

संजय शिंदे यांनी समविचारी नेत्यांची मोट बांधत जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली होती, मात्र लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडल्याने दुखावले गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

कधीकाळी शिंदेंच्या समविचारी गटातील असणारे माजी आ राजेंद राऊत, आ प्रशांत परिचारक, शहाजीबापू पाटील, आ जयकुमार गोरे यांनी शिंदेंना धोबीपछाड देण्यासाठी काम केले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे विजयी झाल्यास त्यांना जि पचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे, अशावेळी मोहिते पाटील समर्थक सदस्य आणि पक्षातील सदस्यांच्या जोरावर सत्ता स्थापनेचे प्रयत्न भाजपने चालवले आहेत.