मंत्र्यांनी सत्कार आणि बैठका घेतल्या म्हणजे विकास होत नसतो; राज्यमंत्री सत्तारांचा दानवे आणि कराडांंना टोला!

abdul satattr

औरंगाबाद : आपल्या जिल्ह्याला केंद्राचे दोन मंत्रीपदे मिळाली आहेत. दानवे यांनी देशाच्या रेल्वे विकासाच्या गप्पा सोडाव्यात. फक्त सोलापूर-जळगांव रेल्वेचा धुळखात पडलेला प्रस्ताव मंजूर करून आणला तरी आपल्यासाठी खूप होईल, तर अर्थमंत्री डॉ. कराड यांनी सत्कार आणि बैठका घेतल्या म्हणजे विकास होत नसतो, त्यासाठी त्यांनी केंद्राकडून अतिरिक्त निधी आणून दाखवावा. असे आवाहन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे तसेच अर्थमंत्री डॉ भागवत कराड यांना केले.

यावेळी बोलतांना पुढे ते म्हणाले, नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनाचा उद्रेक झाला. अशा कठिण परिस्थितीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयम ठेवून सर्व संकटांचा मुकाबला केला. इतके सर्व दिसत असतांनाही केंद्र सरकारने मात्र राज्य आर्थिक अडचणीत सापडले असताना आर्थिक अडवणूक केली. असे मत महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाणी हक्क परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. मराठवाडा विकास आघाडीच्या वतीने गुरूवारी (दि. १६) तापडिया नाट्यगृहात आयोजित मराठवाडा परिषदेत विविध ठराव पारित करण्यात आले.

तत्पूर्वी आयोजक तथा जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी प्रस्ताविक केले. ते म्हणाले, ” मराठवाड्याच्या लोकसंख्येनुसार सिंचन आणि पाणी मिळाले नाही. जायकवाडीत फक्त १३ टक्के पाणी शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारी वाढल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी मराठवाड्यात नियुक्तीवर आहेत. त्यांच्यामुळेच सिंचन वाढत नाही. सिंचन अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक घ्यावी अशी मागणी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याकडे केली.

यावर उत्तर देताना सत्तार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडेच सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करतो, तिथे रमेश गायकवाड यांना देखिल निमंत्रित केले जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी सत्तार म्हणाले, की जिल्हा परिषदेसाठी पन्नास कोटी मी मंजूर करून आणले. आणखी २५ कोटी आणणार आहे. त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने बांधले जाणार आहे. त्यासाठी शंभर कोटी मंजूर करून घेतले आहेत, असेही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या