जम्मू-काश्मीर मध्ये भाजपच्या जाहिरातीमध्ये भगव्या ऐवजी हिरव्या रंगाला प्राधान्य

टीम महाराष्ट्र देशा : हिंदुत्ववाद आणि भगवा झेंड्याचा पुरस्कार करत जनतेसमोर येणाऱ्या भाजप पक्षाने जम्मू काश्मीर मध्ये भगव्या रंगाला हटवत एका जाहिराती मध्ये हिरव्या रंगाचा वापर केला आहे. मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी ही युक्ती लढवली असल्याच दिसून येत आहे. श्रीनगर येथे भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भगव्याऐवजी चक्क हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो छापण्यात आला आहे.

काश्मीरचे श्रीनगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार शेखर खालिद जहाँगिर यांनी आपल्या प्रचारासाठी आणि मताधिक्क्य आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी वृत्तपत्रातल्या एका जाहिरातीमध्ये भाजपचा पारंपारिक भगवा रंग बदलून हिरव्या रंगाचा वापर केला आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र असलेल्या ग्रेटर काश्मीर आणि काश्मीर उजमा या वर्तमानपत्रात भाजपाने शेख खालिद यांच्या प्रचारासाठी जाहिराती दिल्या आहेत.

या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही वापरण्यात आला आहे. तर भाजपाचे नावही हिरव्या रंगात लिहिले आहे. तर भाजपाचे चिन्ह कमळ हे पांढऱ्या रंगात दिसून येत आहे. खोट सोडा, खरा बोला आणि भाजपाला मत द्या, असा संदेशही उर्दु भाषेत या जाहिरातींवर लिहिण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत असे कधीचं झाले नव्हते.

दरम्यान, जम्मू काश्मीर चे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी या जाहिरातींना दुजोरा दिला असून भाजपाच्या झेंड्यात हिरवा आणि भगवा हे दोन्ही रंग वापरात आहेत. हिरवा रंग शांती आणि प्रगतीचे प्रतिक आहे. भाजपा पक्ष रंगांवर विश्वास ठेवत नसून सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय असल्याचे वक्तव्य ठाकूर यांनी केले आहे. तर नॅशनल कॉन्फ्रेन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या जाहिरातीवरून भाजपला लक्ष्य केले आहे.