कोल्हापूर-सांगलीला मोठा दिलासा ; अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

kolhapur sangli

कोल्हापूर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं धूमशान पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने कोल्हापूरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत.

पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला असून आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

परंतु आता महाराष्ट्रातील जोरदार पावसाच्या पार्श्वभुमीवर कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याची माहिती आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.त्यामुळे कोल्हापूर – सांगलीला दिलासा मिळाला आहे. कर्नाटकात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. दोन वर्षापुर्वी या धरणातून पाणी पुढे न सोडल्यामुळे कृष्णेने महाराष्ट्रातील सांगलीत थैमान घातलं होतं. लाखो पूरग्रस्त आणि हजारो जनावरांचं त्यावेळी पुनर्वसन करण्यात आलं होतं.

सध्या राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली व कोल्हापूरकरांना धडकी भरली होती मात्र, अलमट्टी धरणातून विर्सग वाढवल्याने सांगली- कोल्हापुरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने सावधतेचा इशारा दिला आहे. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरफएच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP