ग्रामसेवक आत्महत्या प्रकरण, ‘लोंढेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’

zp

औरंगाबाद : बिडकीनचे ग्रामसेवक संजय शिंदे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. याला जबाबदार असणाऱ्या पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही.डी. लोंढे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. यावेळी ग्रामसेवक शिंदे यांचे आत्महत्या प्रकरण सदस्यांनी उचलून धरले. यावेळी सभागृहात शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, मधुकरराव वालतुरे, रमेश पवार यांच्यासह सर्वच सदस्य आक्रमक झाले होते. गायकवाड म्हणाले की, यापूर्वी सुद्धा गटविकास अधिकारी लोंढे हे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असतांना अनेक ग्रामसेवकांना त्रास दिलेला आहे. तिथेही ग्रामसेवक बुद्धदेव म्हस्के यांनी लोंढे यांच्या अशाच त्रासामुळे आत्महत्या केली. त्याची ही चौकशी सध्या सुरू आहे.

ग्रामसेवक शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गटविकास अधिकारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी वरील सदस्यांनी केली. यावर सदरील प्रकरणी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची समितीमार्फत चौकशी सुरु असून आठ दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या