fbpx

ग्रामसेवक २६ डिसेंबरपासून बेमुदत सामुहिक रजेवर

अभिजित कटके

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या मनमानी कारभाराविरोधात सांगली जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मंगळवार २६ डिसेंबरपासून बेमुदत सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे.

 सांगली जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचा रविकांत आडसूळ यांच्याशी वाद सुरू आहे. रविकांत आडसूळ यांच्यावर कारवाई होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे न घेता अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामसेवकांनी केला आहे. त्यासाठी मोर्चा रद्द करून मेळावा घेऊन सर्वसामान्य जनतेची कामे करतानाच जिल्हा परिषद प्रशासनाशी असहकार आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे. रविकांत आडसूळ यांच्यावरील कारवाईसाठी अभिजित राऊत यांची ग्रामसेवक संघटनेने भेट घेतली. मात्र त्यांनी चौकशी समिती नियुक्त करण्याचा व त्यात दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यावर ग्रामसेवक संघटना समाधानी नाही. त्यामुळे जोपर्यंत रविकांत आडसूळ यांच्यावर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. याशिवाय या मागणीसाठी २६ डिसेंबरपासून सामूहिक रजेवर जाण्याचाही निर्धार ग्रामसेवक संघटनेने केला आहे.