बहिष्कार, भाऊबंदकी आणि धुरळा; अकलूजची चर्चाच चर्चा

vijay sinh mothite vs dhawalsinha mothite

सोलापूर : सहकार,शेती,ग्रामविकास,शिक्षण,संस्कृती अशा नानाविध गोष्टींमुळे अकलूज अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. या अकलूजने ज्या ज्या राजकीय लोकांना पोसले ते ते राज्याच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकले.अकलूज आणि मुरब्बी राजकारण यांचे नाते उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. अकलूज परिसरात निवडणुका म्हणजे निवळ औपचारिकता असते, याला कारण तेथील मोहिते-पाटील या घराण्याचे वर्चस्व! पण यंदा वर्चस्वाच्या लढाईत राजकीय संघर्ष विकोपाला गेल्याने अकलूजच राजकारण ढवळून निघाले.

‘अकलूजचे ग्रामपंचायतचे नगरपरिषदेत रूपांतर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने,अकलूज ग्रामपंचायत निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात’ असे पत्र राज्य शासनाने निवडणूक आयोगाला पाठवले होते.पण नगरपरिषद झाल्यानंतर पुन्हा नव्याने निवडणुकांना सामोरे जावे लागेल म्हणून ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, शेवटच्या क्षणाला ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे तिथे निवडणूक लागली होती.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांनी व त्यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह मोहिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अकलूजचे राजकारण बदलून गेले.मोहिते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या विरोधकांना शरद पवार यांनी जवळ केले. विजयसिंह मोहिते व त्यांचे धाकटे बंधू प्रतापसिंह यांच्यात सुरु झालेल्या राजकीय संघर्षाला आजही पूर्णविराम मिळालेला नाही.तो संघर्ष प्रतापसिंह यांचे चिरंजीव डॉ. धवलसिंह मोहिते यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीतही कायम ठेवला आहे. विजयसिंह मोहिते यांचे चुलतबंधू फत्तेसिंह माने, माजी आमदार चांगोजीराव देशमुख यांचे चिरंजीव पांडुरंगराव देशमुख यांनी डॉ. धवलसिंह यांना सोबत घेऊन विजयसिंह मोहिते यांच्या पॅनलच्या विरोधात त्यांचे दिवंगत बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाने पॅनल उभा केला होता.

अखेर आज आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत असणाऱ्या अकलूजचा निकाल जाहीर झाला आहे. जनतेने स्पष्टपणे आपला कौल जाहीर केला आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून सत्तेच्या नंदवनात असणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाला जनतेने पसंती दिली आहे, एकूण १७ पैकी १४ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह मोहिते यांच्या पॅनलला फक्त ३ जागा मिळाल्या.

महत्वाच्या बातम्या