मृत ग्रामसेवक शिंदेंच्या पत्नीचा आरोप, बीडीओने पैशांची मागणी केल्याने तणावात आत्महत्या

Gram Sevak Shinde Suicide Case, BDO Londhe Demands him 5 lakh rupees

औरंगाबाद : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आज (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांत गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवंगत ग्रामसेवक शिंदे यांच्या पत्नीने दिली फिर्याद…

याप्रकरणी मृत संजय शिंदे यांची पत्नी प्रतिभा संजय शिंदे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत शिंदे यांच्या पत्नीने म्हटले की, संजय शिंदे हे दि. १६ जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता घरी आले तेव्हा ते प्रचंड तणावात होते. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, अडीच वाजेच्या सुमारास बीडीओ विजय लोंढे हे ग्रामपंचायत कार्यालय बिडकीन येथे आले होते. नंतर मला त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये घेऊन जात असताना सांगितले की, बीडीओ लोंढे यांनी त्यांना दि.१८ जानेवारी रोजी परत कार्यालयात येणार असल्याचे कळवले. लोंढे यांनी, मला तुमचे ग्रामपंचायत कार्यालयाचे रेकॉर्ड तपासायाचे आहे. यामुळे तुम्ही सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहावे, असे तोंडी सांगितले. तसेच 15व्या वित्त आयोगाचा आराखडा मंजुरीसाठी मला सोमवारी दि.18 जानेवारी रोजी पाच लाख रुपये बीडीओ व इतर अधिकाऱ्यांना द्यावे लागतील, अशी माहितीही मृत शिंदे यांनी आपल्या पत्नीस सांगितली. एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था कशी करायची या चिंतेमुळे ते प्रचंड तणावाखाली आले होते.

फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, दि. १८ जानेवारी रोजी पती संजय शिंदे हे घरातून सकाळी सहा वाजता पैठण येथे मतमोजणी ड्युटी असल्याने बाहेर पडले. सायंकाळी पती संजय शिंदे व त्यांच्यासोबत सखाराम दिवटे व तुळशीराम पोतदार हे घरी आले. त्यावेळी पती संजय शिंदे यांनी मला घरातून सत्तर हजार रुपये आणून दे असे सांगितले. मी कपाटातील सत्तर हजार रुपये पती संजय यांना दिले. ते सत्तर हजार व त्यांच्याजवळील तीस हजार असे एकूण एक लाख रुपये त्यांनी माझ्यासमक्ष सखाराम दिवटे यांच्या हातात दिले.

दिवटे यांना शिंदे म्हणाले की, माझ्याकडे आता एवढेच पैसे आहेत. तुम्ही सांभाळून घ्या, अशी विनंती दिवटे यांना केली. परंतु दिवटे हे पती संजय यांना म्हणाले की, बीडीओ लोंढे व विस्तार अधिकारी भास्कर साळवे हे पाच लाख रुपयांपेक्षा कमी घेणार नाहीत. असे म्हणून ते दोघे पैसे सोबत घेऊन निघून गेले. नंतर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पती संजय हे घरी आले असता अत्यंत उदास व तणावाखाली दिसत होते. त्यांना काय झाले अशी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, आता माझे काही खरे नाही. बीडीओ लोंढे यांना आज एक लाख रुपये देऊनसुद्धा त्यांचे काही समाधान झाले नाही. त्यांनी मला उरलेले चार लाख रुपये आणून देण्यास दि. १९ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे. पैसे न दिल्यास ते माझ्याविरुद्ध खोटी कार्यवाही करून बडतर्फ करण्याची धमकी देत आहेत. तसेच ग्रामसेवक पोतदार व कांबळे हे मला म्हणतात की, बीडीओ लोंढे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना पाच लाख रुपये देऊन टाक, अन्यथा ते तुला बडतर्फ करून टाकतील. लोंढे, साळवे, दिवटे, पोतदार यांच्या सांगण्यावरून मुद्दामहून मला त्रास देण्यात येत आहे. दिवटे यांना माझ्या जागी बिडकीन ग्रामपंचायतला ड्युटी हवी होती. त्यांना ती जागा मिळाली नाही. याचा दिवटे यांना राग होता म्हणून ते त्रास देत असल्याचे शिंदे यांनी घरी सांगितले.

तणावात येऊन ग्रामसेवक शिंदें यांनी केले विष प्राशन

दि.१९ जानेवारी रोजी तणावाखाली असलेले संजय शिंदे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना तत्काळ बिडकीन येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी पत्नीने त्यांना विचारपूस केली असता ते म्हणाले की, बीडीओ लोंढे, विस्तार अधिकारी साळवे, सखाराम दिवटे, तुळशीराम पोतदार यांच्या सततच्या पैशांच्या मागणीला वैतागलो आहे. त्यांची आर्थिक मागणी मी पूर्ण करू शकत नाही. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही. त्यामुळे मी औषध प्यायल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. नंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथिल खाजगी रूग्णालयात दाखले केले होते.उपचारादरम्यान दि.२१ जानेवारी गुरूवार रोजी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान त्यांचे निधन झाले.

याप्रकरणी गटविकास अधिकारी विजय लोंढे, विस्तार अधिकारी भास्कर साळवे, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सखाराम दिवटे, ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. पंकज उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, सुधाकर चव्हाण, जमादार सतीश बोडले, शेषराव नाडे हे करत आहेत.

पूर्वीही एका ग्रामसेवकाच्या आत्महत्येप्रकरणी बीडीओ लोंढेंची चौकशी सुरू

गटविकास अधिकारी लोंढे हे वर्धा जिल्ह्यात पंचायत समिती समुद्रपूर येथे कार्यरत असताना तेथील ग्रामसेवक बुद्धदेव म्हस्के यांनीसुद्धा आत्महत्या केली होती. याप्रकरणी गटविकास अधिकारी लोंढे यांची चौकशी चालू आहे.

ग्रामसेवक संघटनेचे बीडीओ लोंढेंवर कारवाईसाठी निवेदन

बीडीओ लोंढे यांनी पैठण तालुक्यातून 14व्या वित्त आयोगाच्या कामाचे बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय पैसे देण्यात येऊ नये, असे बँकेला आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बँकेतून पैसे काढण्याचे आदेश देण्यासाठी पैसे दिल्याशिवाय ते आदेश देत नसल्याचा आरोप होतोय. 15व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला मंजुरी देण्यासंबंधी चौकशीची मागणी करतात. बीडीओ लोंढे यांच्या दहशतीखाली सर्व ग्रामसेवक ताणतणावात काम करत आहेत असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या