ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान

औरंगाबाद : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल ५ वाजेपासून थांबला आहे. उद्या 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीचे मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आज सायंकाळी मतदान साहित्यांसह निवडणूक अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण २ हजार ९० प्रभागांतील ५ हजार ६८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून तब्बल १६ हजार ९५७ जणांनी अर्ज दाखल केले होते. ५ हजार ५४८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. वैजापूर तालुक्यात १६३०, सिल्लोडमध्ये १५०९, कन्नड १५१२, पैठण १७३२, औरंगाबाद १४४५ तर गंगापूर तालुक्यात १४४८ उमेदवार रिंगणात आहेत.

सोशल मीडियावर प्रचार सुरुच

निवडणूक प्रशासनाच्या वतीने गावातील प्रचाराचे जाहिरात फलक, पोस्टर काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थांबला असला तरी सोशल मीडियावर मात्र प्रचाराचा धुराला सुरुच आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्याने उमेदवार सोशल मीडियाचा वापर करून मतदारांना मत देण्याचे आवाहन करीत आहे.

शहरातील मतदारांना उमेदवारांचे साकडे

कोरोनाच्या पार्श्भूमीवर मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांनी गावाकडचा रस्ता धरला होता. मात्र, गावातील नागरिकांनी गावात कोरोना येऊ नये म्हणून शहरातील नागरिकांना गावात प्रवेश नाकारला होता. गावाच्या प्रवेशद्वारावर काट्या टाकून रस्ते बंद केले होते. आता शहरातील मतदारांनी मतदानाला गावाकडे यावे असे आवाहन उमेदवार करतांना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या