ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मीडियावर धुरळा

Digital GramPanchayat

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे. दरम्यान, सोशल मीडियातून उमेदवार धुमाकूळ घालत असून त्यावर कुणाचेही बंधन नाहीये. प्रचाराची वेळ संपत आल्याने उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे गावागावांत नव्हे तर फेसबूक पोस्ट आणि व्हाट्स अपमधून देखील वाहू लागल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ५ जानेवारीपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. उमेदवारी मागे घेणे, निवडणूक प्रचारचिन्हे मिळाल्यानंतर सर्व पॅनल आणि उमेदवारांनी दणकून प्रचाराला लागण्याचे नियोजन केले.
सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे.

जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतीत सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक महिला उमेदवार आहेत. जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील एकूण २०९० प्रभाग आणि २२६१ मतदान केंद्रांवर १५ रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांत वैजापूर ३१५, सिल्लोड ३३६, कन्नड ३१२, पैठण ३२१, औरंगाबाद ३१६, गंगापूर २८७, फुलंब्री १७१, सोयगाव ११४, खुलताबाद ८९ केंद्रांचा समावेश आहे. प्रचाराची वेळ संपत आल्याने सर्व उमेदवारांनी आता सोशल मीडियावर भर दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय राजकारणापासून ते थेट जातीनिहाय मतदानाचा विषय रंगत आहे.

महत्वाच्या बातम्या