सरकारने ठरवल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमती २५ रुपयांपर्यंतही कमी होऊ शकतात – चिदंबरम

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असल्याने विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत असून, केंद्र सरकारने ठरवलं तर ते पेट्रोल-डिझेलच्या किंमती २५ रुपयांपर्यंतही कमी करू शकतं, असा दावा माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. तसच पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लावून सरकार जनतेची लूट करत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यात. त्यामुळे लिटरमागे सरकारला १५ रुपये कमी मोजावे लागताहेत. तरीही, सरकार नागरिकांच्या खिशातून ही रक्कम काढतंय. त्यासोबतच, १० रुपयांचा अतिरिक्त करही जनतेकडून वसूल केला जातोय. तो थांबवल्यास, जनतेला इंधन दरात थेट २५ रुपयांचा दिलासा मिळू शकेल, असं ट्विट चिदंबरम यांनी केलं आहे. त्याचवेळी, सरकार असं काही करणार नाही, पेट्रोल-डिझेलचे दर १-२ रुपयांनी दर कमी करून ते नागरिकांना फसवतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.