गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर आणि रामलक्ष्मण यांचा १७ व्या ‘पिफ’अंतर्गत विशेष सन्मान

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या गोविंद निहलानी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध संगीतकर रामलक्ष्मण यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत केली. महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणा-या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे हे १७ वे वर्ष आहे. येत्या गुरूवारी दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता कोथरूड सिटीप्राईड चित्रपटगृहात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर आणि रामलक्ष्मण यांना वरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर चिलीचा ‘डॅम किड्स’ हा गोन्जालो जस्टिनिअॅनो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविला जाईल, अशी माहितीही डॉ. पटेल यांनी यावेळी दिली.

Loading...

हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री तबू हिची यंदाच्या ‘पिफ’मध्ये खास उपस्थिती असणार आहे. महोत्सवाच्या दुस-या दिवशी तबू ‘अंधाधुन’ या आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी सिटीप्राईड कोथरूड येथे उपस्थित राहणार आहे, तर १२ जानेवारीला ‘अंधाधुन’चे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्यासह तबू सिटीप्राईड कोथरूड चित्रपटगृहाच्या मागील बाजूस भरवल्या जाणा-या ‘फिफ फोरम’ला भेट देणार आहे.

नावाजल्या गेलेल्या अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या गोविंद निहलानी आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदा ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. निहलानी यांचे ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’, ‘विजेता’, ‘तमस’, ‘द्रोहकाल’, ‘देव’ हे चित्रपट विशेष नावाजले गेले. याबरोबरच भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याबरोबरच नुकतेच ‘ती आणि इतर’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले आहे.

तर दुसरे पुरस्कार विजेते दिलीप प्रभावळकर हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक असून त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘झपाटलेला’, ‘चौकट राजा’, ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. मराठी दूरचित्रवाणीमध्ये ‘आबा टिपरे’ ही भूमिका जणू त्यांची ओळख झाली आहे. त्यांच्या ‘अनुदिनी’ या पुस्तकावर आधारित ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. याबरोबरच ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये त्यांनी साकारलेले महात्मा गांधी प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरले. ‘अलबत्त्या गलबत्त्या’ या नाटकातील चेटकिणीची भूमिका, ‘नातीगोती’ या नाटकातील मानसिकदृष्ट्या विकलांग मुलाच्या बापाची त्यांनी साकारलेली भूमिका गाजली, तर रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या ‘आरण्यक’ या नाटकामध्येही त्यांची प्रमुख भूमिका आहे. प्रभावळकर लेखक म्हणूनही प्रसिद्ध असून असून ‘बोक्या सातबंडे’, ‘गुगली’ यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.

यानंतर ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड अॅवार्ड’ने सन्मानित करण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रामलक्ष्मण यांचे खरे नाव विजय पाटील असून त्यांना संगीतकार लक्ष्मण म्हणूनही ओळखले जाते. नागपूरहून मुंबईला आलेल्या त्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या मोहमयी दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वत:चा स्वतंत्र असा ठसाही उमटवला. रामलक्ष्मण ही संगीत दिग्दर्शकांची जोडीच होती. त्यापैकी राम यांचे १९७६ मध्ये निधन झाले. त्यानंतही लक्ष्मण यांनी ‘रामलक्ष्मण’ हेच नाव कायम ठेवले. तब्बल ९० हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटात एकाहून एक सरस गाणी दिली. ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. ‘राजश्री प्रॉडक्शन’ आणि रामलक्ष्मण हे समीकरण प्रचंड यशस्वी झाले. ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.

– संगीतकार रामलक्ष्मण यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ जाहीर
– राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या मुख्य उपस्थितीत होणार ‘पिफ’चे उद्घाटन
– प्रसिद्ध अभिनेत्री तबू हिची ‘फिफ’मध्ये खास उपस्थिती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये