शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ८० रुपये मदत ही अत्यंत तोकडी – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यपाल महोदय यांनी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली खरीप पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये मदत अत्यंत तोकडी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.

हेक्टरी आठ हजार रुपये मदत म्हणजे प्रती गुंठा ऐंशी रुपये इतकी कमी मदत आहे. राज्यात फळबागांचे विशेषतः द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जाहीर केलेली मदत नुकसानीच्या मनाने अत्यंत तोकडी आहे. राज्यपाल यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून प्रति हेक्टरी खरीप पिकांसाठी कमीत कमी २५ हजार रुपये तर फळबागांसाठी ५० हजार रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर करावी. अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी केली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.

मराठवाड्यातील तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई मदतरूपात देण्यासाठी मराठवाड्याला २९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज पडणार आहे. पिकांचे पंचनामे करून नेमके किती नुकसान झाले, शेतकऱ्यांना किती मदत करावी लागेल, याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सादर केला आहे. पीकस्थितीचे नुकसान लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी बांधावर भेटी सुरू करताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. यानंतरच पंचनाम्याला देखील गती आली.

महत्वाच्या बातम्या