या तोकड्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नाही – एकनाथ शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

महामहिम राज्यपाल यांचेकडून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली खरीप पिकांना प्रति हेक्टरी 8 हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या जाहीर झालेल्या मदतीतून शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार नसल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी 25 हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

त्याचबरोबर नुकसान झालेल्या शेतातील जुन्या पिकांचे अवशेष बाहेर काढणे, शेतातील गवत व इतर कचरा साफ करून रब्बी हंगामसाठी शेती पेरणीयोग्य करण्यासाठी मनरेगा / रोजगार हमीतून मदत करण्यात यावी अस एकनाथ शिंदे यांनी सुचवलं आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.

मराठवाड्यातील तब्बल ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांना फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची भरपाई मदतरूपात देण्यासाठी मराठवाड्याला २९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची गरज पडणार आहे. पिकांचे पंचनामे करून नेमके किती नुकसान झाले, शेतकऱ्यांना किती मदत करावी लागेल, याचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने सादर केला आहे. पीकस्थितीचे नुकसान लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी बांधावर भेटी सुरू करताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. यानंतरच पंचनाम्याला देखील गती आली.

महत्वाच्या बातम्या