पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ घेणार राज्यपालांची भेट

pooja chavan

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले होते. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. याप्रकरणावर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ मुख्य आरोपी म्हणून संजय राठोड यांचे नाव घेत आरोप करत आहेत. चित्रा वाघ यांनी सतत ट्विट करत पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणाशी संबधीत मंत्री यांना पोलिसांसमोर हजर करण्याची मागणी करत आहेत.

आज दुपारी ३.३० वाजता पोलिस महासंचालक यांची भेट घेऊन झाल्यानंतर त्या ४.४५ वाजता राज्यपालांच्या भेटीस जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे. या ट्विटमध्ये, ‘पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांची संदिग्ध भुमिका व संशयीत मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड अद्याप बेपत्ता या संदर्भात आज दुपारी ३:३० वा.मा.पोलिस महासंचालक यांची तर संध्या.४.४५ वा.महामहीम राज्यपाल यांची राजभवन येथे भेट घेत आहे.’ असे म्हंटले आहे.

याप्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहेत. मात्र पोलिसांकडून तपासात उशीर होत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित बेपत्ता आरोपी संजय राठोडांचा तपास लवकर करावा या मागणीसाठी चित्रा वाघ आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या