मुंबई : मागील अनेक दिवसांपासून देशातील राजकीय चर्चेमधील मुद्दा असणाऱ्या पुद्दुचेरीत अखेर काँग्रेसचे सरकार पडले. पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार आज बहुत सिद्ध न करु शकल्याने पडलं. रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीमध्ये काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यात यश आलं नाही. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ वर संधान साधले आहे.
‘पुद्दुचेरी (आपले पाँडिचेरी) हे केंद्रशासित आणि लहान राज्य आहे. 30 निर्वाचित आमदार आणि तीन नामनिर्देशित आमदार मिळून 33 आमदारांची विधानसभा, पण भारतीय जनता पक्षाने हे छोटे राज्यसुद्धा काँग्रेसकडून खेचून घेतले आहे. पुद्दुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नारायणसामी यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पाच आमदारांनी बेडुकउडय़ा मारल्याने सामी यांचे सरकार अल्पमतात आले. पाच आमदारांनी साडेचार वर्षांपर्यंत काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यात अण्णा द्रमुकचे आमदारही होते, पण आता हे सर्व आमदार कमळफुलाचे भुंगे बनले आहेत. विधानसभा चारेक महिन्यांत लागतील. तोपर्यंत भाजप किंवा केंद्र सरकारला थांबता आले असते, पण येथेही सरकार पाडून दाखवले असा टेंभा मिरवायला भाजप मोकळा झाला.
पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सामी यांच्या सरकारला धड काम करू दिले नाही. हे राज्य केंद्रशासित असल्याने तेथील राज्यपालांना जरा जास्तच अधिकार असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला लोकहिताचा प्रत्येक निर्णय किरण बेदी फिरवू लागल्या. अर्थात, दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असे वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुद्दुचेरीचे, त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात. राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांनाही कढीपत्त्याप्रमाणे वापरून फेकून दिले आहे हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या ‘भाज्यपालां’नी समजून घेतले पाहिजे. केंद्रीय सत्तेचा वापर करून विरोधकांची राज्यांतील सरकारे पाडायची हे सध्या काही जणांना शौर्य वगैरे वाटत असेल तर ते चूक आहे.’ महाराष्ट्रात देखील राज्यपाल या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात नेहमी वाद सुरु असतात.
महत्त्वाच्या बातम्या
- मद्यधुंद कारचालकाने रिक्षाचालकासह दुचाकीस्वाराला उडवले; औरंगाबादेत रात्री भीषण अपघात
- मराठवाड्यात ६०५, औरंगाबादेत सर्वाधिक २४० रुग्णांची भर; १९७ कोरोनामुक्त, चौघांचा मृत्यू
- मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी; उद्योजक संघटनांची मागणी
- पुण्यात कोरोना वाढतोय : दिवसभरात नवे ६६१ कोरोनाबाधित !
- खुशखबर! नांदेड विभागात एप्रिल महिन्यापासून सहा गाड्या धावणार