मराठा विरूध्द इतर समाजात संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा डाव- अशोक चव्हाण

fadnavis-ashok chavan

राज्यात आरक्षणासाठी सुरु असलेले मराठा समाजाचे आंदोलन चिघळवून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा डाव आहे. हा महाराष्ट्रा विरोधात केलेला कट आहे. महाराष्ट्रातील सामाजिक एकतेचे व बंधुभावाचे वातावरण बिघडवून टाकायचे. जाती-जातीत संघर्ष पेटवून मराठा समाजाला एकटे पाडायचे. इतर समाजांना त्याच्याविरोधात लढवून ध्रुवीकरण करायचे, हा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. या अगोदर राजकीय फायद्यासाठी भीमा कोरेगावची दंगल घडवून मराठा विरूध्द दलित असा संघर्ष निर्माण केला गेला. राजकीय फायद्यासाठी सरकार अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहे असा आरोप करून फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येऊन सरकारचा हा कट उधळून लावावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.

गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, आ. अब्दुल सत्तार आणि आ. भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज परळी येथे जाऊन आंदोलनकर्त्या मराठा बांधवाची भेट घेतली. मतपेटीच्या राजकीय स्वार्थासाठी भाजप सरकारने राज्यातील सामाजिक एकता व बंधुभावाच्या भावनेला नख लावले आहे. मराठा समाजाला वारंवार खोटी आश्वासने देऊन सरकारने मराठा समाजची फसवणूक केली आहे. सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊन असे आश्वासन दिले होते मात्र गेल्या साडेतीन वर्षात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला नाही. मुस्लीम आरक्षणाला न्यायालयाने मान्यता दिल्यानंतरही सरकार जाणिवपूर्वक आरक्षण देत नाही. सरकारने मराठा धनगर आणि मुस्लीम समाजाची फसवणूक केली आहे. त्याविरोधात राज्यभरात मराठा समाज आंदोलन करत आहे. आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत हे अतिशय संतापजनक आहे. पंढपूरच्या गर्दीत साप सोडून चेंगराचेंगरी घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. गुप्तचर विभागाकडे याचे पुरावे आहेत असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. सरकारकडे पुरावे होते तर मग कोणावर कारवाई का केली नाही? असा संतप्त सवाल करून वारक-यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळ व त्यांना गुरु मानणा-यांच्यांच डोक्यात येऊ शकतो आंदोलनकर्त्या मराठा बांधवांच्या नाही, असा टोला लगावला.

काकासाहेब शिंदे या आंदोलक युवकाने जलसमाधी घेतली. जगन्नाथ सोनावणे या आंदोलकाने विष प्रश्न केले होते त्यांचाही आज मृत्यू झाला. दोन आंदोलकांच्या मृत्यूनंतरही सरकार ढिम्म बसले आहे. आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही. नेमक्या किती आंदोलकांचा जीव गेल्यावर सरकार चर्चा करणार आहे? असा संतप्त सवाल खा. चव्हाण यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आंदोलन चिघळले आहे. संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री व सरकार मात्र फक्त पाहात बसले आहे. राज्याच्या सर्व भागात आंदोलन सुरु आहे. सरकारतर्फे मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांने आंदोलकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात काही बोलत नाहीत. साधे शांततेच आवाहनही केलं नाही. यावरून हे आंदोलन सरकारला चिघळवायचे आहे यावर शिक्कामोर्तब झाल आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

सरकारचा विरोध करणा-यांना गन्हेगार ठरवले जात आहे. शेतक-यांनी मोर्चा काढला त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. एल्गार परिषदेच्या आयोजकांना माओवादी ठरवण्याचा प्रयत्न सरकारने केला. भीमा कोरेगाव दंगलीच्या ख-या सूत्रधारांना सोडून आंदोलन करणा-या दलित बांधवांची माता भगिनींसह धरपकड केली त्याच धर्तीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुंतवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाबाबत चर्चा खुप झाल्या आहेत आता चर्चा नाही कृती करा विधिमंडळाचे एकदिवशीय विशेष अधिवेशन सरकारने बोलवावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

या पत्रकारपरिषदेला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस यशवंत हाप्पे, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे उपस्थित होते.