‘पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन सर्वोतोपरी मदत करणार’ – विजय वडेट्टीवार

waddetiwar

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत आहेत. गावातील अनेक सखल भागात घरांमध्ये तसच बाजारपेठेत पाणी शिरलं असून, नदी पात्रा जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत.

पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला असून आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. कोल्हापूरात पुराची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. चिपळूण शहराला पाण्याने वेढल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.

NDRF च्या २ टीम तातडीने तेथे रवाना करण्यात आल्या आहेत. कोस्टल गार्डला बोटीच्या सहाय्याने मदतीसाठी विनंती केली आहे. जेवणाचे पाकीट तयार केले जात आहेत, पूरग्रस्तांना रेस्क्यू करून सुरक्षितस्थळी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.’ अशी माहिती त्यांनी दिली. ‘पुरामुळे अद्याप कुठेही जिवीतहानी झाली नाही. पूरग्रस्त भागावर प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. सरकार कुठेही लोकांच्या मदतीसाठी कमी पडणार नाहीत.

आवश्यक असेल ती सर्वोतोपरी मदत करून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच ‘चिपळूण नगरपालिकेने २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. रत्नागिरी मधून १, पोलीस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अशा ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पुणेहून एनडीआरएफच्या दोन टीम खेडसाठी १ व चिपळूणसाठी १ येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत आहे,’ अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP