fbpx

राज्यात उभारणार 8 लाख घरे- मुख्यमंत्री

Government will build 8 lack houses-CM

नागपूर-  देशाची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असल्यास केवळ महानगरे केंद्रस्थानी ठेऊन भागणार नाही. इतर शहरांच्या विकासावर भर दिली तरच देश खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर जाईल. त्यामुळे महानगर श्रेणीत न मोडणाऱ्या शहरांमध्ये राज्य सरकार 8 लाख घरे उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी नागपुरात दिली. क्रेडाईतर्फे आयोजित न्यू इंडिया समीट परिषदेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, घरबांधणी प्रकल्पाशी संबंधीत सर्व गोष्टी ऑनलाईन राहणार असून त्यासाठी ई-प्लॅटफॉर्म कार्यान्वित केले जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीत राज्य आघाडीवर असून ही आघाडी टिकवून ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे अशा उपक्रमांसाठी क्रेडाईने पुढे येण्याची गरज आहे. सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी क्रेडाईसारख्या संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.

आपण पुढे आल्यास सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधांचा या प्रकल्पात समावेश असणार आहे. या परिषदेमध्ये झालेली चर्चा व ठराव या संदर्भात क्रेडाईने शासनाला सादर केल्यास या चर्चा क्षेत्रातील निर्णयावर शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापनावर मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाशी बांधिलकी दर्शवत दोनशेहून अधिक क्रेडाई सदस्यांनी क्रेडाई क्लिन सिटी मुव्हमेंट लिमीटेडशी सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दोन लाखांहून अधिक घरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षाच्या कालावधीत घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाअंतर्गत एक दशलक्षाहून घरापर्यंत पोहचण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी क्रेडाईचे अक्षय शाह, गितांबर आनंद, आनंद सिंघानिया, सतीश मगर आणि शांतीलाल कटारिया प्रामुख्याने उपस्थित होते.

3 Comments

Click here to post a comment