पाकिस्तानचे संस्थापक जीनांच्या मुंबईतील बंगल्याचे सरकार करणार पुनरुज्जीवन

jinnah-house

टीम महाराष्ट्र देशा- १९३५-३६ मध्ये पाकिस्तानचे संस्थापक बॅ. मोहम्मद अली जीना यांनी मलबार हिलवर बांधलेल्या बंगल्याचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार सरकार करत आहे. दिल्लीतील हैदराबाद हाऊसच्या धर्तीवर परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांसह चर्चा-बैठकांसाठीचे मुंबईतील एक केंद्र म्हणून त्याचा विकास करण्याचा विचार असल्याची माहिती परराष्ट्र विभागाच्या अखत्यारीतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदचे (आयसीसीआर) अध्यक्ष व खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.मुंबईतही अनेक परदेशी पाहुणे येत असतात. दिल्लीत हैदराबाद हाऊस हे परदेशी पाहुण्यांशी चर्चा – विचारविनिमय करण्याचे केंद्र आहे. त्याच धर्तीवर मुंबईत या जीना हाऊसचे पुनरुज्जीवन करून पुरातत्त्व खात्याच्या नियमांप्रमाणे त्याचा विकास करण्याचा विचार आहे, असे सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.

विनय सहस्रबुद्धे यांनी रविवारी जीना हाऊसला भेट दिली. १९८२ मध्ये ब्रिटिश उच्चायुक्तालयाकडे या बंगल्याचा ताबा होता. त्यांनी तो रिकामा केल्यानंतर तो विनावापर पडून आहे. या बंगल्याचा ताबा १९९७ पासून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडे आला आहे. या बंगल्याचा व परिसराचा चांगला वापर व्हावा या दृष्टिकोनातून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही चर्चा झाली आहे, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

जिना हाऊस काय आहे?

जिना हाऊसची प्रमुख ओळख म्हणजे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं मुंबईतील निवासस्थान अशी आहे. मलबार हिलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या अगदी समोर हा भव्य बंगला आहे.1936 मध्ये मोहम्मद अली जिना जेव्हा इंग्लंडहून कायद्याचं उच्चशिक्षण घेऊन भारतात परतले तेव्हा त्यांनी हा बंगला बांधला, असं बोललं जातं. जिना यांनी भारतात परतल्यानंतर मुस्लीम लीगचा कार्यभार सांभाळला आणि त्यानंतर हे घर बांधलं.

जिनांच्या जन्माआधी काही काळ त्यांचे वडील जिन्हाभाई पूंजा कराची इथे व्यवसायासाठी स्थलांतरीत झाले, कराची तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये येत होती.मोहम्मद अली जीना यांनी हा बंगला बांधला. भूखंडाचा आकार १२ हजार ७१८ चौरस मीटर असून त्यातील १९०४.५० चौरस मीटरवर बंगल्याची दुमजली मुख्य वास्तू उभी आहे. याच बंगल्यात १९४६ मध्ये जीना व पंडित नेहरू यांच्यात फाळणी टाळण्याबाबत चर्चा झाली होती. सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांनीही या बंगल्यात जीना यांच्यासह चर्चा केली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश उच्चायुक्तालयाकडे त्याचा ताबा गेला. १९८२ पर्यंत तो वापरात होता.

त्याकाळी हे घर बांधण्याचा खर्च जवळपास 2 लाख रूपये आला होता आणि घर संपूर्णपणे युरोपियन स्टाईलने बांधण्यात आलं होतं. त्याकरता इटालियन मार्बल आणि खास वॉलनटची लाकडंही मागवण्यात आली होती, असं बोललं जातं.मात्र भारताच्या फाळणीनंतर जिना पाकिस्तानात गेले आणि त्यांची मुलगी दिना वाडिया, ज्या भारतात राहतात त्यांनी या घराच्या कायदेशीर वारस असल्याचा दावा केला. मात्र अद्याप हा बंगला केंद्र सरकारच्या ताब्यात आहे.