fbpx

राज्य सरकारने जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगावी : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : राज्याला यंदा भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. मात्र अद्याप दुष्काळग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी असं म्हणत राज्य सरकारला फटकारले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, भाजप केवळ निवडणूक लढविणारा पक्ष असून यांना जनतेशी काही देणंघेणं नाही. दुष्काळी उपाय योजनेवर उच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला विचारलेल्या जाबाने हे सिद्ध होते. तसेच मुख्यमंत्र्यांना दुष्काळ सोसत नसताना राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते दुष्काळी भागात जाऊन जनतेची मदत करत आहेत. भाजप मंत्र्याचा मात्र या भीषण परिस्थितीत देखील वाचाळवीरपणाच सुरु आहे.

दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मार्च २०१६-१७ ते २०१८ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन मोठा दिलासा देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र आता राज्यात सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केल आहे. तर कर्ज फेडू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.