गुंतवणुकीबाबत भाजप सरकारचे खोटारडे दावे उताणे पडले – सचिन सावंत

sachin sawant and devendra fadnvis
गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडल्याचा काँग्रेसचा आरोप सत्यच

मुंबई – व्यवसायासाठी सुलभ राज्यांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र देशातल्या पहिल्या 10 राज्यांतही स्थान मिळवू शकला नाही. आघाडी सरकारच्या काळात अग्रेसर असणारा महाराष्ट्र भाजप शिवसेना सरकारच्या काळात 13 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे गुंतवणुकीबाबत राज्य सरकार व भारतीय जनता पक्षाने केलेले खोटारडे दावे उताणे पडले आहेत, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र सारखे मोठं मोठ्या डोळे दिपवणा-या इव्हेंट्च्या दिव्याखाली प्रत्यक्षात काळाकुट्ट अंधार असल्याचे जागतिक बँकेच्या मदतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारची जाहिरातबाजी आणि इव्हेंटवर केल्या जाणा-या कोट्यवधींच्या उधळपट्टीतून राज्याचे नुकसान आणि जाहिरात व इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांचे उखळ पांढरे झाले आहे. यातून राज्यातील जनतेच्या हाती काहीही लागले नाही. सरकारने जाहीर केलेले 8 लाख कोटी आणि 16 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे आकडे कुठे गेले? याचा खुलासा मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी करावा अशी मागणी सावंत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी बंदूकबाज मंत्र्यांला जबाबदारीतून मुक्त करून हॉलीवूडला पाठवावे

मॅग्नेटीक महाराष्ट्र च्या जाहिरातीचे फलक अद्याप खाली उतरलेले नसताना व्यवसाय सुलभते संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अहवालामुळे सरकारच्या इज ऑफ डुंईग बिझनेसचा बनावट मुखवटा ही गळून पडला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा, झारखंड, छत्तीसगड या राज्याची कामगिरी महाराष्ट्रापेक्षा सरस राहिली आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र राज्य उद्योग आणि गुंतवणुकीत पिछाडीवर गेल्याचे वास्तव दाखवले होते, ते सत्य आहे यावर या अहवालाने शिक्कामोर्तब झाले आहे. राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी देशातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणुक राज्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाने केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सरकारचा खोटेपणा उघड करून महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीत पिछाडीवर गेला आहे हे दाखवले होते. काँग्रेसच्या आरोपांना खोटे ठरविण्याकरता मी महाराष्ट्र हितेषी आहे की महाराष्ट्र द्वेषी आहे? असा प्रश्न भाजप प्रवक्ते आ. राम कदम यानी मला विचारला होता. खोटी आकडेवारी देऊन भाजपतर्फे आ. राम कदम आणि सरकारकडून पत्रकारपरिषद घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काँग्रेसला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांचाही आता मुखभंग झाला असून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल भाजप आणि सरकारने राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी सावंत यांनी केली.

सरकार राज्यात गुंतवणूक आणण्यात आणि औद्योगिक विकासात सपशेल अपयशी ठरले आहे हे वारंवार दिसून आले पण अतिरंजीत आणि खोटे आकडे देऊन सरकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करित आहे. या सरकारचा खोटेपणाचा डोलारा आता कोसळला असून महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकासात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करणा-या सरकारने महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर नेऊन ठेवला आहे असा टोला सावंत यांनी लगावला.

अरे चंद्रकांत दादा किती वेळा चुकताय ? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल