सरकार पाळत ठेवत असल्याचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा आरोप

ramdas kadam

टीम महाराष्ट्र देशा: बंद दरवाजाआड आमची चर्चा सुरु होती. तिथेही पोलिस घुसले आणि मी काय काय बोलतोय, त्याची शूटिंग केली गेली. आता राज्यातील मंत्र्याच्या मिटिंगमध्येही तुम्ही पोलिस पाठवताय आणि तुमच्याच मंत्र्याचा गोपनीय अहवाल तुम्हीच तयार करताय, असे सरकार मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिले नाही. अशी खंत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बोलून दाखवली आहे.

मी गृहराज्यमंत्री होतो. पण असे काम कधी केले नाही. विरोधी पक्षांसंदर्भात समजू शकतो, विरोधी पक्ष काय बोलतात ते बघू वगैरे. पण सत्ताधारी पक्षातील मंत्री काय करतोय, हे पाहण्यासाठी सुद्धा पोलिस पाठवत आहात, असे कधी आयुष्यात पाहिले नाही. अस देखील रामदास कदम म्हणाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकारी मंत्र्यांनीच सरकारवर हेरगिरीचा आरोप केला आहे. सरकार पाळत ठेवत असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीडमधील जाहीर सभेत म्हटले.

याआधी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्राँचच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्यानं एकच खळबळ उडाली होती.