सरकार निरपराध लोकांचा जीव घेत आहे, त्वरित कडक लॉकडाउन लावावा : राहुल गांधी

rahul gandhi

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

या सर्व भीषण परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलेले आहे. ‘केंद्र सरकारला समजत नाहीये. कोरोनाचा प्रसार थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण लॉकडाउन आहे. केंद्र सरकारची निष्क्रियता बर्‍याच निरपराध लोकांना मारत आहे.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी त्यांचा केंद्र सरकारवरील संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा सकाळी तज्ज्ञांसोबत महत्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये ते देशात गंभीर रुप घेतलेल्या कोरोनाला कसे रोखायचे, संकटाची व्याप्ती, देशभरातील ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा, रेमडेसीवीर तुटवडा आदींबाबत चर्चा केली होती. तसेच देशातील कोरोना योद्ध्यांच्या म्हणजेच मनुष्यबळावर देखील चर्चा केली आहे. या बैठकीतून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, अनेक तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पंतप्रधान मोदी आपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात, अशी माहिती सध्या मिळत आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्बल घटकांची योग्यप्रकारे सोय करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या