fbpx

सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे – जयंत पाटील

jayant patil

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात शेतीमालाच्या किंमती घसरल्या… तेलाचे दर घसरल्यामुळे सोयाबीनचे दर उतरले…तुरीलाही भाव मिळेना…पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत त्यातच सिलेंडरचे दरही सरकारने वाढवले.एकंदरीतच हे सरकार घेत असलेल्या धोरणांविषयी जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर केली. सांगली येथे सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज हल्लाबोल आंदोलन करण्यात आले . यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी सरकारच्या कारभारावर आणि सरकारच्या धोरणांवर वाभाडे ओढले.

सध्या राज्यात आणि देशात महागाईचा आगडोंब इतका उसळलाय की कोंबडीपेक्षा अंडयांचा दर वाढलाय. या सरकारने घेतलेले निर्णय आणि धोरणांवर जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. एकंदरीतच मोदी सरकारबद्दल समाजातील सर्व घटकांना शंका आहे. सरकारने दिलेली प्रत्येक आश्वासने मागेच राहिली आहेत. फक्त या सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. या सरकारने नोटाबंदीचा फसलेला निर्णय घेतला परंतु याचा फायदा हा टाटा, बिर्ला, अंबानींना घरपोच नोटा पुरवण्यासाठी झाला तर सर्वसामान्य जनतेला मात्र रांगा लावून आपला जीव गमवावा लागला आहे. या देशात आणि राज्यात सरकार शेतकऱ्यांना दिलासा देवू शकलेले नाही.सरकारने आत्तापर्यंत जी-जी भूमिका घेतली ती सर्वसामान्यांच्या हिताची घेतलेली नाही.त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारची भीती वाटू लागली आहे असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून सरकारवर केला.