गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवर जास्तीत जास्त उत्पादक, पुरवठादारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

राज्यातील सर्व शासकीय विभागांनी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवरूनच खरेदी करावी. तसेच जास्तीत जास्त उत्पादक व पुरवठादार नोंदणीकृत व्हावेत यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.

आज GeM राष्ट्रीय अभियान उद्योग विभाग व उद्योग संचालनालयामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. या कार्याशाळेत गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस, नवी दिल्ली यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनीही मार्गदर्शन केले. राज्यातील मंत्रालयीन सर्व विभागांचे व इतर मुख्य कार्यालयांचे खरेदी अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.

डॉ.कांबळे पुढे म्हणाले, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवर देशपातळीवर झालेल्या 10 हजार कोटींच्या उलाढालीमध्ये राज्याचा वाटा हा केवळ 360 कोटी एवढाच आहे. राज्यातील या पोर्टलवरील उलाढाल वाढविण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होणार आहे. राज्यात पोर्टलवरील विविध विभागांनी आतापर्यंत केलेली एकूण खरेदी 360 कोटी एवढी आहे. यात जेम पोर्टलवर राज्यातील नोंदणीकृत 8 हजार 378 पुरवठादार आहेत, तर  या पोर्टलवर आतापर्यंत 4 हजार 653 खरेदी आदेश दिले गेले आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी बोलताना अजय कुमार यांनी सांगितले, शासनासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवरून खरेदी प्रक्रिया राबविण्याची ही नवीन प्रक्रिया आहे. मार्च 2016 मध्ये  सुरुवातीला यात संगणक विक्री आणि टॅक्सी सेवा दोन सेवांचा समावेश करण्यात आला होता. सातत्याने यात बदल होत आहेत. अशा प्रकारच्या कार्यशाळेतून येणारे सूचना आणि सल्ले यांचा समावेश करून या पोर्टलवर सातत्याने बदल केले जात आहेत. महाराष्ट्रात अनेक उद्योगांचे माहेरघर असल्याने राज्यातून अधिकाधिक पुरवठादार यात नोंदणीकृत व्हावेत यासाठी अधिक जनजागृती करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

उद्योग संचालनालयामार्फत खरेदी कार्यालयासाठी GeM पोर्टलबाबत प्रशिक्षण 45 कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेस 1 हजार 960 प्रशिक्षणार्थी अधिकारी  अधिकारी  उपस्थित होते तर उत्पादक व पुरवठादार यांच्या 39 प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याला 509 उत्पादक व पुरवठादार उपस्थित होते.