‘सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची जास्त काळजी’

‘सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची जास्त काळजी’

प्रवीण दरेकर

मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. गेले दोन आठड्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, यामुळे एसटीची चाके पूर्णपणे थांबल्याचे चित्र दिसत आहे. गेले काही दिवस बंद असलेल्या एसटीमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

भाजपने एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab), भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. कालच्या झालेल्या बैठकीत सरकारकडून अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत पडळकर आणि खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आज ते भूमिका स्पष्ट करणार आहेत.

या दरम्यान, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार दारूवरील कर कमी करत आहे, पण सरकारला इंधनावरील कर कमी करण्यास वेळ नाही. गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, पण सरकारला या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची काळजी आहे. जर एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले तर सरकार जबाबदार असेल, असा इशारा देखील दरेकर यांनी दिला आहे.