मुंबई: राज्यात सध्या भोंग्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. या संदर्भातच आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची असून त्याचा भंग झाला तर आवश्यक ती कारवाई पोलिसांनी करणं आवश्यक असल्याचे म्हटले.
दरम्यान या बैठकीला अनेक भाजप नेत्यांनी पाठ फिरवली. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदुषणासंदर्भात २००५ मध्ये निर्णय दिला. त्याआधारे राज्य सरकारने २०१५ ते २०१७ या काळात काही GR काढले आणि त्याआधारे लाऊडस्पीकरचा वापर, परवानगी, अटी-शर्थी स्पष्ट केल्या आहेत. त्याच आधारे राज्यात लाऊडस्पीकरचा वापर करता येतो. मात्र लाऊडस्पीकर वापराबाबत अनेक इशारे सध्या दिले जात आहेत. मात्र सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भोंगे लावलेत, वापर करत आहेत त्यांनीच विचार करायचा आहे. असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच खेडेगावात रोज भजन, किर्तन व विविध कार्यक्रम सुरू असतात. नवरात्रीचा उत्सव, गणेशोत्सव, गावाकडील यात्रा यावर काय परिणाम होतील यावरही यावेळी चर्चा झाली. कायदा समाजासाठी समान असल्याने सर्वांसाठी एकच भूमिका घ्यावी लागेल. केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि संपूर्ण देशासाठी लागू केला तर राज्यांमध्ये वेगळी परिस्थिती असणार नाही. अन्यथा सर्वपक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय नेत्यांना भेटावं आणि त्यातून भूमिका स्पष्ट करावी. असेही वळसे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळात भोंगे वापरण्यावर बंदी असल्याचेही वळसे पाटील यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या:
- “प्रत्येकाने धार्मिक भावना आपल्या मनात ठेवाव्यात”- शरद पवार
- …तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय?- देवेंद्र फडणवीस
- ‘लिव इन रिलेशनशिप मध्ये बलात्कार नसतो’, गणेश नाईकांना करणी सेनेचा पाठींबा
- “राजकारणासाठी हनुमानाचा वापर करणे..”, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- “मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले”; देवेंद्र फडणवीसांचा आरोप