fbpx

सरकार आता तरी जागं व्हा, मुलाला नोकरी नाही म्हणून आईनेच केली आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा : देशातील बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे युवा वर्ग निराश आहे. नोकरी नसल्या कारणाने अनेक बेरोजगार तरुण जीवन संपवताना दिसत आहेत. परंतु मुलाला नोकरी नाही म्हणून आईने आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे घडली आहे.

संगीता फसले असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. त्या शेतमजूर होत्या, त्यांच्या मुलाचं डीएडचं शिक्षण पूर्ण झालं होतं. पण या शिक्षणानंतरही त्यांच्या मुलाला नोकरी मिळू शकली नाही. तसेच दुष्काळाची परिस्थिती असल्याने मजुरी मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे घरखर्चासाठी मिळकतीचे साधन नसल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, शिक्षक भरतीवर असलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी वारंवार होत आहे. यासाठी शिक्षकांनी अनेक वेळा आंदोलने देखील केली आहेत. आणि आता आईनेच आत्महत्या केली आहे त्यामुळे या सरकारला जाग कधी येणार असा सवाल उपस्थित होत आहे.