संजय गांधी निराधार योजनेची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी शासन सकारात्मक – राजकुमार बडोले

minister rajkumar badole

सातारा : संजय गांधी निराधार योजनेची आजची वार्षिक उत्पन्न मर्यादा २१ हजार आहे ती वाढवून ४० हजार करण्याच्या मागणी संदर्भात शासन सकारात्मक असल्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. दहिवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

शासन दिव्यांगासाठी ६०० रुपये जो निर्वाह भत्ता देते तो वाढवून ७०० करण्यासंदर्भात आणि संजय गांधी निराधार योजनेचेही ६०० वरुन ७०० रुपये करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे बडोले यांनी सांगितले. आज मागासवर्गीय शिक्षणाचे प्रमाण ८० टक्के झाले आहे पण त्या प्रमाणात त्यांना रोजगार आणि हाताला काम मिळायला हवे म्हणून व्यावसायिक उभे करण्यासाठीही आमचे प्रयत्न असणार आहेत. गेल्या तीन वर्षात सामाजिक न्याय विभागाने महत्वपूर्ण काम केली आहेत. त्यात प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह सुरु करण्याचा निर्णय असून असे वसतीगृह दहिवडीत बांधून तयार झाले आहे. इंदू मिलची स्मारकासाठीची विस्तारित जागा , लंडन मधील स्मारक या बाबीही आपण केल्या असल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले.

खटाव आणि माण या दुष्काळी तालुक्यात मागासवर्गीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना चांगले आणि गुणवत्तेचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून वसतीगृहात जागा वाढवून देण्याबाबतही विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी मतदार संघातील समाज कल्याण विभागाच्या विविध कामाचा आढावा घेतला आणि तालुक्यातील राहिलेली काम पूर्ण करावीत . वसतीगृहातील विद्यार्थ्याची संख्या वाढून मिळावी अशी मागणी केली त्याला सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी आपल्या भाषणात सकारात्मक प्रतिसाद दिला.