fbpx

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

सोलापूर :  ग्रामीण भागाचा विकास झाला तरच या राष्ट्राची प्रगती होणार आहे, हा राष्ट्र वैभवशाली बनणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना आणल्या आहेत. त्याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. ग्रामीणभागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

सोमवारी सकाळी आठ वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी ग्रामपंचायतीस भेट देऊन सहकारमंत्री देशमुख यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी राज्य सहकारी बँकेचे संचालक अविनाश महागावकर, पंचायत समितीचे सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, सरपंच शिवम्मा गुरव, प्रधान गुरव, लिंबाजी वंजारे, शिवाजी धुळवे, इंद्रजीत माने, सुशीलकुमार वंजारे, सचिन वळसंगे, अकबर शेख, चंद्रकांत गुरव, राजकुमार देशमुख, बसप्पा वंजारे, गोरख माळी, संतोष खेडकर आदी उपस्थित होते.

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, गेल्या साडेचार वर्षात केंद्र व राज्य शासनाने चांगले काम करून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना या माध्यमातून गरिबांना घरकुल देण्यासाठी महत्वकांक्षी योजना प्रभावीपणे या सरकारने राबवली. रस्तेही या भागात चांगली झाली आहेत. शेतकऱ्यांसाठीही शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक वेळेवर येत नसल्याने कामे खोळंबली आहेत, असे सहकारमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर सहकारमंत्री देशमुख यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गावच्या विकासासाठी तत्पर राहण्याचे आदेश दिले. यावेळी सहकारमंत्री देशमुख यांनी लक्ष्मीबाई सार्वजनिक वाचनालयासही भेट देऊन वाचन संस्कृती विषयी माहिती जाणून घेतली. त्यामुळे गावकर्‍यांतून  समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी बसवराज गंभीरे, इसाक शेख, संगमेश्वर वंजारे, समर्थ उपासे आदी उपस्थित होते