मतदानाआधीच वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकरांना दणका

टीम महाराष्ट्र देशा : गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’ हा बहुचर्चित चित्रपट ५ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. राज्यात सर्वत्र हाऊसफुल्ल सुरू असलेला हा चित्रपट सामान्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र या चित्रपटाला लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा मोठा फटका बसला असून निवडणूक आयोगाने चित्रपट थिएटर मध्ये दाखविण्यास, चित्रपटाचे पोस्टर लावण्यास आणि इलेक्ट्रोनिक मिडीयात सुरु असलेले चित्रपटाचे प्रोमो दाखविण्यास नोटीसद्वारे मनाई केली आहे. निवडणूक आयोगाची ही नोटीस राजकीय दबावातून आल्याचा दावा चित्रपटाचे निर्माते उत्तमराव जानकर यांनी केला आहे.

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘धुमस’ या चित्रपटात उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह विशाल निकम, रोहन पाटील, कृतिका गायकवाड, साक्षी चौधरी, भारत गणेशपुरे यांच्या भूमिका आहेत. उत्तमराव जानकर यांना पाठविलेल्या नोटीस मध्ये गोपीचंद पडळकर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने ही नोटीस बजावल असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे, आचारसंहिता लागू असल्याने चित्रपटाच्या टीजरला आयोगाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते असे नमूद करताना चित्रपटाशी संबधित सर्व गोष्टी हटविण्यास सांगितले आहे.

या बद्दल बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले, आम्ही राजकीय नेते असलो तरी कलाकार सुद्धा आहोत. आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले आहे. चित्रपटात दाखवलेली परिस्थिती हे राज्यातील वास्तव असल्यामुळे लोकांना हा चित्रपट आपलासा वाटत आहे. परंतु विरोधकांच्या राजकीय डावपेचामुळे निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आणि या चित्रपटाचे राज्यभरातील पोस्टर व बॅनर उतरवले आणि चित्रपटाचे प्रदर्शन महाराष्ट्रभर बंद करावे लागले आहे.