धनगर आरक्षण समितीचा आमदार पडळकरांना दणका, घेतला हा निर्णय…

Gopichand Padalkar

सोलापूर: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे निर्माण झालेला वाद थांबताना दिसत नाही. पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. तर आता धनगर आरक्षण समितीने पडळकर यांना दणका दिला असून त्यांना समितीतून बेदखल करण्यात आलं आहे.

धनगर समाजातील नेत्यांनी देखील आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या धनगर समाजाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असं धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी सांगितले आहे. वेळापूर येथे धनगर समाज कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे. शिवाय आरक्षणाचा मुद्दा ही बाजूला गेला आहे. त्यामुळे अशा बेताल व्यक्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पडळकर यांना यापुढे आरक्षण लढ्यात कुठेही सहभागी करून घेतले जाणार नसल्याचं, जानकर यांनी जाहीर केले.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर अन्याय केला. ते धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

जुन्या सहकाऱ्याकडून पडळकर यांचा समाचार
कधीकाळी पडळकर यांचे सहकारी राहिलेले राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी देखील त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांना दगलबाज तर फडणवीस यांना भामटा म्हणता येऊ शकत, पण आमची ती संस्कृती नाही. पडळकर हे केवळ प्रसिद्धीसाठी भडक विधाने करत आहेत, अशी टीका जानकर यांनी केली आहे.