महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांचं काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालंय – पडळकर

gopichand padlkar

सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. यातच आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात 19 जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते घेत असताना आता निवडणुका लागल्याने हा मुद्दा पेटणार असल्याचे चिन्ह आहे. भाजपमधील ओबीसी नेत्यांनी देखील या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून राज्यसरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठीच 26 जूनला राज्यभर भाजपचे चक्काजाम आंदोलन आहे.

त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांचं काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालंय. आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय.जिथं ओबीसी मंत्र्यांच्याही शब्दाला मातीची किंमत नाहीये, तिथं सर्वसामान्य ओबीसींविषयी या प्रस्थापितांना किती आकस असेल. एकीकडे ओबीसी मंत्री म्हणतात “जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही” पण दुसऱ्याच दिवशी निवडणूका जाहीर होतात. काय किंमत झालीये ओबीसी मंत्र्यांची? तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का ? असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.

तर, तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का? आता बास झालं. ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वास घात करून निवडणूका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही ओबीसी बहुजनाच्या आक्रोशाची आग महाराष्ट्रभर पेटेल. आणि येत्या २६ तारखेला तुम्ही समस्त ओबीसी, भटके, बहुजन, अठरापगड बारा बलुतेदार समाजाची ताकद बघालच. तुमच्या गढ्यांना धक्का द्यायला आम्ही येतोय. असा सणसणीत टोला पडळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP