जीएसटी’ युगाला सुरुवात

वेबटीम : शुक्रवारी रात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘जीएसटी’ करप्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. रात्री बारा वाज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जीएसटी’ अ‍ॅपचे उद्घाटन करून देशभर नवी करप्रणाली लागू करण्यात आली.

देशात अस्तित्वात असलेले सर्व अप्रत्यक्ष कर आता जीएसटीमध्ये एकत्रित समाविष्ट करण्यात आले आहेत. एक देश, एक कर, एक मार्केट या संकल्पनेतून ही करप्रणाली राबवण्यात येणार आहे

 

सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले की, ‘जीएसटी’ एकमताने मंजूर झाल्यामुळे एकप्रकारे आपल्या प्रगल्भ आणि मूल्याधिष्ठित लोकशाहीचा सन्मानच झाला आहे. ‘जीएसटी’मुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत  होणार आहे. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाल्याचा आपल्याला अभिमान आहे. एकच करप्रणाली देशभरात अस्तिवात येणार असल्याने गुंतागुंत संपुष्टात येणार आहे. देशातील आणि विदेशी गुंतवणुकीच्या दृष्टीने ‘जीएसटी’ लाभदायक ठरणार आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘जीएसटी’वर एकमताने मोहर उमटल्याने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचाच विजय आहे.

गुड अँड सिम्पल टॅक्स – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ‘जीएसटी’ म्हणजे गुड अँड सिम्पल टॅक्स असल्याचे सांगितले. या करप्रणालीमुळे देशात एका नवीन व्यवस्थेचा प्रारंभ होणार आहे. ‘जीएसटी’ कोणा एका सरकारची किंवा पक्षाची उपलब्धी नसून यापूर्वीची सर्व सरकारे आणि पक्ष यांच्या परिश्रमातून साकारल आहे.  देशाचे आर्थिक एकीकरण झाल्याने व्यवहार करणे आता अधिक सोपे होणार आहे, असे सांगून मोदी म्हणाले, केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्याचे उत्तम उदाहरण म्हणून या करप्रणालीकडे पहावे लागेल. कच्ची पावती, पक्‍की पावती, या गोंधळातून आता सर्वांची सुटका झाली असून सर्वांना व्यवसाय करणे सोपे जाणार आहे .