सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांकडून आणखी एक खुशखबर

मुंबई : एसटी महामंडळाच्या 1 एप्रिल 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचेअध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे 13हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून त्यांना अंदाजे 240 कोटीरुपयांची फरकाची रक्कम एकरकमी देण्यात येईल.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल,एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारीअशोक फळणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रावते यांनी जून 2018 मध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली होती. या वेतनवाढीचा लाभपूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 एप्रिल 2016 पासून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. एप्रिल 2016 ते जून 2018 या दरम्यानच्या काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आाला होता. पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही फरकाची रक्कम हप्त्यांमध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णयआज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना रावते यांनी यावेळी महामंडळाच्याअधिकाऱ्यांना दिल्या.

या निर्णयामुळे महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणारआहे. जून 2016 नंतर आतापर्यंत महामंडळाचे सुमारे 13 हजार कर्मचारी निवृत्तझाले असून त्यांना अंदाजे 240 कोटी रुपयांची फरकाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही उर्वरित फरकाची रक्कम सेवानिवृत्तीनंतर एकरकमी देण्यात येणार आहे.