उस्मानाबादसाठी खुशखबर; ‘कृष्णा’तून मिळणार सात टीएमसी पाणी

औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कृष्णा मराठवाडा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे. आता या प्रकल्पाच्या प्राधान्यक्रमात दुधाळवाडी आणि रामदरा तलावापर्यंतच्या कामाचा समावेश झाला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत मंजुरी दिली आहे. यामुळे २०२४ पर्यंत या योजनेतील सात टीएमसी पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला. याचा फायदा उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना मिळणार आहे.

उस्मानाबाद जिल्हयासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प मंजूर असून या अंतर्गत योजनेची कामे सुरू होती. मात्र, भाजप सरकारच्या काळात योजनेचा निधी खर्च करण्यासाठी प्राधान्यक्रमाची अट ठेवण्यात आली. यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी अखर्चित राहिला होता. त्या कारणाने योजनेतील कामे थांबली होती.

उस्मानाबाद जिल्हयात शेतकरी आत्महत्या सतत वाढत आहेत. सततच्या दुष्काळामुळे ही योजना पूर्ण करण्याचे महत्त्व लक्षात घेवून खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास बाळासाहेब घाडगे – पाटील यांनी सरकारकडे प्रस्ताव पाठवून योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली. कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत दुधाळवाडी, रामदरा तलावापर्यंतच्या कामाचा प्राधान्यक्रमात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर २०२०च्या अर्थसंकल्पात आमदार डॉ. तानाजी सावंत, खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास बाळासाहेब घाडगे – पाटील यांच्या प्रयत्नाने ८०० कोटींची तरतूद करण्यात यश मिळाले. त्यानंतर आता प्रकल्पाच्या प्राधान्यक्रमात दुधाळवाडी आणि रामदरा तलावापर्यंतच्या कामाचा समावेश झाला आहे.

महत्वाच्या बातम्या