विमान प्रवाश्यांसाठी खुशखबर; ३० मिनीटात मुंबई गाठणे शक्य

Aurangabad Airport

औरंगाबाद : शहरातील चिखलठाणा विमानतळावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम (जीएनएसएस) यंत्रणा सुरू झाल्याने मुबंई- औरंगाबाद विमान प्रवास हा १० मिनिटांनी कमी होणार आहे. यामुळे मुंबई आता अवघ्या ३० मिनिटांत गाठणे शक्य होईल. यामुळे औरंगाबाद-मुबंई विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. आता नवीन यंत्रणेने सिडको, जयभवानीनगरच्या दिशेने लँडिंग सहज शक्य होईल.

औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावरील एका धावपट्टीवर जीएनएसएस यंत्रणा सुरू आहे. पण दुसऱ्या धावपट्टीवर जीएनएसएस यंत्रणा नसल्याने विमान लँड करण्यासाठी पंधरा किलोमीटर पुढे जावे लागत होते. टेक ऑफ आणि लँडिंगसाठी ही जीएनएसएस यंत्रणा अतिशय उपयुक्त आहे. मुंबईला पोहोचण्यासाठी आतापर्यंत ४५ मिनिटे लागत होती. जीएनएसएस यंत्रणा सुरू झाल्यामुळे आता तीस ते पस्तीस मिनिटे लागतील.

सद्दस्थितीत मुंबई, अहमदाबाद आदी शहरांतून येणारी विमाने आधी चिकलठाणा परिसरातील आकाश मार्गाकडे वळून फेरा मारून चिकलठाण्याच्या बाजूने असलेल्या धावपट्टीवर उतरावे लागत होते. मात्र जीएनएसएस यंत्रणा सुरू झाल्याने पायलटला पाच किलोमीटर आधीच विमान उतरवण्यासाठी धावपट्टी सुरक्षित आहे की नाही याची माहिती मिळेल. त्यामुळे मुंबई, अहमदाबाद प्रवासाचा वेळ दहा मिनिटाने कमी होणार आहे, अशी माहिती विमानतळाचे अधिकारी विनायक कटके यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या