आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव

पुणे : बातमी सर्वाना दिलासा देणारी.एकीकडे जगभर कोरोनाची दहशत असताना दुसरीकडे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पुण्यातील नायडू रुग्णालयातील करोना बाधित दोन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्या दोघांची डिस्चार्ज प्रक्रिया झाली आहे. आतापर्यंत सात रुग्ण करोना मुक्त झाले आहेत पुण्यातील आणखी २ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ वर गेली आहे.६व्या आणि ७व्या रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. दोघांच्याही डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

दरम्यान, या आधी जे कोरोनामुक्त झाले होते त्यात महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधीलसह एक प्रवासी यांचा यात समावेश आहे. यातील दाम्पत्याचे दुसरे निगेटिव्ह रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा तर उरलेल्या तिघांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आले आहेत.

दरम्यान, भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात २१ दिवस लॉकडाउन असून, या संकटकाळात केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. जगभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या आजारामुळे जगभरात २१ हजार मृत्यू झाले आहेत.