गोंदिया–भंडारा पोटनिवडणुक: ५० ठिकाणी उद्या पुन्हा होणार मतदान

EVM

मुंबई: ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने गोंदिया –भंडारा लोकसभा मतदारसंघातील ५० ठिकाणी उद्या पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर आणि गोंदिया–भंडारा येथे लोकसभेच्या पोटनिवडणूक पार पडल्या मात्र या दोन्ही ठिकाणी ईव्हीएम मशीन संदर्भात समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गोंदिया –भंडारा लोकसभा मतदारसंघातील ५० ठिकाणी उद्या मतदान होणार असून अद्याप वेळ निश्चित झाली नाही. मतदारसंघात २५ टक्के मशिन्स बंद पडल्याने मतदानावर परिणाम झाला होता. अनेक तास मतदार उन्हा-तान्हात ताटकळत उभे होते. शेवटी मतदार मतदान न करताच घरी परतले.

दरम्यान, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकारीपदासह जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी तडकाफडकी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याजागी नागपूरच्या जिल्हा परिषद सीईओ कादंबरी भगत-बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.