रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे दीड लाखांचे दागिने

सोलापूर : प्रामाणिकपणा समाजात असूनही जिवंत असल्याचा प्रत्यय सोलापूरकरांना आला. महिला प्रवाशाचे रिक्षात विसरलेले दीड लाख रुपये किंमतीचे दागिने रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केले आहेत. गोरख जगदाळे असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील ६० वर्षाच्या अनुराधा विठ्ठल गुंड या एसटीने सोलापुरात आल्या होत्या.

शहरातील आमराई परिसरात राहणाऱ्या आपल्या मुलीकडे जाण्यासाठी त्यानी रिक्षाने जायचे ठरविले. एसटी स्टॅन्डवरुन त्यांनी (एमएच १३जी ७२७८) ही रिक्षा पकडली. त्यावेळी त्यांच्याजवळ दोन पिशव्या होत्या. भैय्या चौकात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्या उतरल्या. मात्र, लाल रंगाची एक पिशवी त्या रिक्षामध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनुराधा यांनी तातडीने नवी वेस पोलीस चौकी गाठली. आणि तिथे कार्यरत असलेल्या पोलिसांना हकीकत सांगितली.

कॉन्स्टेबल अविनाश शिंदे यांनी त्या आजीबाईंना आपल्या दुचाकीवर बसवून रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टॅन्ड गाठले. तेथील रिक्षा चालकांशी चर्चा केली. आजीबाईंनाही रिक्षा चालकास ओळखण्यास सांगितले. मात्र, रिक्षाचालक दिसून आला नाही. पोलिसांनी रिक्षात विसरलेल्या पिशवीतील मोबाईलवर संपर्क केला आणि गोरख जगदाळे या रिक्षा चालकाने मोबाईल उचलताच त्याला रिक्षासह नवी वेस चौकीस येण्यास सांगितले. तत्पूर्वी रिक्षा चालक आणि त्याच्या पत्नीने आजीबाईंना शोधण्यासाठी बसस्थानक आणि रेल्वे स्थानक गाठले.

मात्र आजीबाई दिसून आल्या नव्हत्या. पोलीस चौकीला येताच आजीने रिक्षाचालकाला ओळखले. येताना चालकासोबत त्याची पत्नीसुद्धा सोबत आली होती. गोरख जगदाळे या चालकाने रिक्षात विसरलेली आजीबाईची पिशवी पोलिसांना काढून दिली. त्यावेळी आजीचे डोळे पाणावले होते.

Comments
Loading...