गोव्याचा अर्थसंकल्प जाहीर : पर्यटन, कृषी, शिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी विशेष तरतुदी

टीम महाराष्ट्र देशा : गोवा राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. रोजगार निर्मिती आणि कृषी, आरोग्य व शिक्षण या घटकांना मध्यवर्ती ठेऊन राज्य सरकारने हा अर्थसंकल्प बनवला आहे.

हा अर्थसंकल्प गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात बनवण्यात आला होता. मात्र कालानुरूप बदल करत आताचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. 19 हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतुद असलेला हा अर्थसंकल्प आहे. दहा टक्के विकास दर अपेक्षित धरण्यात आला आहे. येत्या तीन वर्षात सरकारी व खासगी क्षेत्रात अनेक रोजगार संधी निर्माण केल्या जातील. प्राथमिक स्तरापासून विद्यापीठ स्तरापर्यंतच्या शिक्षणाच्या दर्जात सुधारणा केली जाईल. तसेच तांत्रिक शिक्षण क्षेत्रात देखील बदल करणार असल्याच अर्थसंकल्पात नमूद केले आहे.

या अर्थसंकल्पात पर्यटनावर विशेष भर देण्यात आला आहे. सागर माला योजनेंतर्गत राज्यातील नऊ जेटींचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. राज्याचे पर्यटन केवळ किनारपट्टीपुरतेच मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातही घेऊन जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पर्यटकांना मुलभूत आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. खासगी क्षेत्रच्या सहभागाने अशा सुविधा आऊटसोर्स केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.