Gao: मनोहर पर्रिकरांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

भाजप नेते मनोहर पर्रिकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पर्रिकरांनी कोकणी भाषेतून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मनोहर पर्रिकरांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत पर्रिकरांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र पर्रिकरांनी शपथविधीनंतर उद्याच बहुमत सिद्ध करु, असा विश्वास वर्तवला आहे. मनोहर पर्रिकरांचा शपथविधी रोखण्यात यावा, यासाठी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तुमच्याकडे बहुमत होते, तर मग राज्यपालांकडे का संपर्क साधला नाही, असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला प्रतिप्रश्न केला.

‘आम्ही विधानसभेत आधी बहुमत सिद्ध करु. यानंतर मंत्रीपदाचे वाटप केले जाईल. कोणाकडे कोणत्या मंत्रीपदाची जबाबदारी द्यायची, या बद्दलचा निर्णय बहुमत सिद्ध केल्यानंतर घेतला जाईल,’ असे मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच पत्रकारांना सांगितले. यावेळी पर्रिकरांनी काँग्रेसचादेखील समाचार घेतला. ‘१० वर्षांमध्ये काँग्रेसने राज्याला १२ मुख्यमंत्री दिले. त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद असल्याने कोणीही त्यांच्यासोबत जाण्यास तयार नाही. त्यांनी आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय दिला. तुम्ही बहुमत सिद्ध केले का?, हा प्रश्न मी आज पुन्हा त्यांना विचारु इच्छितो. आमच्याकडे पहिल्या दिवसापासून २१ आमदारांचा पाठिंबा होता. काँग्रेसचे आमदार बसमधून राज्यपालांची भेट घेण्यास गेले. त्यांना कारमधून जाण्याची भीती वाटत असावी. काँग्रेसचे आमदार कारमधून गेले असते, तर राज्यपालांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचेपर्यंत काही कार गायब झाल्या असत्या, अशी भीती त्यांना होती. म्हणून ते १७ आमदारांना एका बसमधून घेऊन गेले,’ अशा शब्दांध्ये मुख्यमंत्री होताच पर्रिकरांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

‘मी बहुमताचा आकडा कसा गाठला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्रावर सही करताना प्रत्येकाने मनोहर पर्रिकरांना दिल्लीहून गोव्याला पाठवण्यात यावे, ही एकमेव अटी घातली होती. मला सुदिन आणि विजय यांनी पाठिंबा दिला. त्यांनी विकासाच्या मुद्यावर मला साथ दिली. मी त्यांचा आभारी आहे. आमच्याकडे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे. आम्ही निवडणुकीनंतर आघाडी केली आहे. त्यामुळे आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करु आणि हे सरकार ५ वर्षे टिकेल,’ असा विश्वास पर्रिकरांनी व्यक्त केला. मनोहर पर्रिकरांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरुन त्यांचे अभिनंदन केले.