भाजप मंत्री म्हणतो युवकांनो जर गुंड बनायचे असेल ‘तर’ हे करा

इटावा – ‘मिडीयाला मसाला पुरवू नका’ ही मोदींची सूचना भाजप नेते गंभीरपणे घेताना दिसून येत नाहीये. आणखी एका भाजप नेत्याने युवकांनो गुंड बनायचे असेल तर जिमला जा असं म्हणत अकलेचे तारे तोडले. जयकुमार जॅकी असं या मंत्र्याचं नाव आहे.

उत्तर प्रदेशातील इटावा येथे एका क्रिकेट सामन्याचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मंत्री जयकुमार जॅकी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी खेळाडूंना सल्ला देताना एक अजब विधान केल्याने ते चर्चेत आले आहेत. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे. त्याच क्षेत्रात तयारी करा आणि त्याच क्षेत्रातील लोकांशी मैत्री ठेवा, असे तरुणांना सांगताना त्यांनी एक अजब उदाहरण दिले. ते म्हणाले, जर तुम्हाला गुंड व्हायचे असेल तर जिममध्ये जा आणि पिळदार शरीरयष्टी बनवा कारण त्यामुळे लोक तुमचे काहीही बिघडवणार नाहीत.

क्रिकेट मालिकेचे उद्घाटन केल्यानंतर खेळाडूंना सल्ला देताना जयकुमार जॅकी म्हणाले, नेहमी आपले लक्ष समोर ठेऊन चालत रहा. काही विद्यार्थी शालेय शिक्षण पूर्ण करतात मात्र पुढे काय करायचे याची त्यांना माहितीच नसते. हे देशाचे दुर्देव आहे की ते आपल्या आवडत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकत नाहीत.