आरक्षणासाठी संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार, २५ ऑक्टोबरपासून राज्यभर दौरा

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. त्यामुळे आता चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा राज्यभर दौरा काढण्याचं जाहीर केलं आहे. अल्टिमेटम देऊनही मराठा आरक्षणाबाबत या सरकारने काहीच केले नसल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच येत्या २५ ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले.

‘आम्ही गेल्या काही महिन्यांपासून शांत बसलो आहोत. काहीही ठोस निर्णय झालेला नाहीये. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं त्यानंतर मी नांदेड येथील दौऱ्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यावर सुद्धा काहीही भाष्य नाही. कुठलीही चर्चा नाही. केवळ कोरोनाचे कारण सांगत पुढे ढकलायचे, त्यामुळेच पुन्हा आमचा महाराष्ट्र दौरा सुरू होत असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.

राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा सोडला तर इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे येत्या २५ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

संभाजीराजे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. पण त्यांनी आश्वासन पाळले नाही. आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची?, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. तसेच टीका करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असे टोला देखील त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या