ग्रामस्थांनी  दिले अजगराला जीवदान

महाड : अजगरसारखा महाकाय सरपटणारा प्राणी दिसला की मारण्याचा एकमेव उपक्रम असणा-या ग्रामीण भागात आता खूपच पशुपक्षांबाबत जनजागृती झाली आहे. महाडच्या सिस्केप संस्थेच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचे आज सकाळी एक चांगले उदाहरण दिसून आले महाड तालुक्यातील चोचिंदे वनीकोंड येथे.
      चोचिंदे वनीकोंड येथील शशिकांत बटावले या ग्रामस्थांच्या जनावरांच्या गोठ्यात सरपटणारा प्राणी आहे याची चाहूल लागली. येथील गणेश भुवड या तरूणाने सिस्केपसंस्थेकडे याची खबर देताच संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री, पंकज चौधरी आदींनी चोचिंदे वनीकोंड येथे धाव घेतली. अकरा ते बारा फूट लांबीचा व 28 किलो वजनाचा साधारण सहा ते सात वर्षाचा तो  अजगर होता असे मेस्त्री यांनी सांगितले. त्याला पकडण्यासाठी मात्र गोठ्यातील खूप अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्याला व्यवस्थित पकडण्यासाठी सिस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री, सौरभ शेठ, पंकज चौधरी व गावातील समीर बटावले, संदेश वनगुले, नंदू वनगुले व वनखात्याचे वनरक्षक पी.  डी. जाधव व ए. ए. सकपाळ यांनी मदत केली.  गावातील सारे लहान मोठे ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सर्पमित्र येईपर्यंत कोणीही अजगरावर प्रहार करण्याचा निर्णय न घेतल्याबद्दल चोचिंदे वनीकौड ग्रामस्थांचे सिस्केप संस्थेने आभार मानले. ब-याच वेळेनंतर मेस्त्री यांनी अजगराला पकडले. आता हेच अजगर वनखात्याच्या मदतीने नेहमीप्रमाणे जंगलात सोडण्यात येईल असे प्रेमसागर मेस्त्री यांनी स्पष्ट केले. चोचिंदे वनीकोंड गावाने दाखविलेल्या या सर्पप्रेमाबद्दल वनखाते आणि सिस्केप संस्था यांनी गावाचे आभार मानले.